बोरीवलीच्या नामदार अजित पवार ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकणाऱ्या जवळपास ७६ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही चारकोपच्या एका खासगी क्लासमध्ये घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. जो पेपर कॉलेजमध्ये सोडविणे अपेक्षित होते, तो या मुलांनी ट्युशनमध्ये सोडविला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून कॉलेजचे प्राचार्य प्रशांत गायकवाड व क्लासचालक मकरंद गोडस यांना चारकोप पोलिसांनी अटक केली आहे.
औरंगाबादमध्ये स्थानिक नेत्याच्या घरी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी परीक्षा देत असल्याची घटना ताजी असताना शिक्षणाच्या बाजारीकरणाचा हा आणखी एक प्रकार चारकोपमध्ये उघडकीस आला आहे. बोरीवली पश्चिमच्या देवीदास लेनमध्ये ‘राम पंडागळे एज्युकेशन ट्रस्टचे नामदार अजित पवार ज्युनियर कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात हे ७६ विद्यार्थी शिकतात. तर चारकोपच्या मकरंद गोडस क्लासमध्ये ही मुले खासगी ट्युशनसाठी जातात. ट्युशनसाठी या विद्यार्थ्यांना क्लासचालक मकरंद गोडस (४६) याने मोठी फी आकारली आहे.
महाविद्यालयातील विज्ञान विषयाची परीक्षा ही गोडसच्या खासगी क्लासमध्ये घेण्यात आल्याची तक्रार कॉलेजमधील प्राचार्यप्रशांत अरविंद गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी चारकोप पोलिसांकडे केली होती. फेब्रुवारी, २०१७ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली. हा सगळा प्रकार गेल्या वर्षभरापासून गायकवाड यांना माहिती असल्याचे त्यात समोर आले. तसेच सहामाही परीक्षेत हाच प्रकार घडल्याचे उघड झाले. त्यामुळे सोमवारी रात्री मकरंद गोडस आणि प्रशांत गायकवाड या दोघांनाही अटक केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गायकवाड यांनी गोडस विरोधात आधीच तक्रार का केली नाही? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थी आणि पालक चिंतित झाले आहेत. कॉलेजच्या अन्य शिक्षकांच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे.
