जगभरात रॅनसमवेअरने धुमाकूळ घातल्याने आणि या माध्यमातून हॅकर्सनी हजारो कॉम्प्युटर्स हॅक केल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांना या सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. आता या हल्ल्यापासून नेमका बचाव कसा करायचा, यासाठी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून एका सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता हे सत्र आयोजित करण्यात आले असून webcast.gov.in/cert-in या संकेतस्थळावर या सत्राचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
रॅनसमवेअरच्या माध्यमातून कॉम्प्युटर यंत्रणा हॅक केल्या जात आहेत. जगभरातील जवळपास १०० देशांना या सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून ‘रॅनसमवेअर म्हणजे काय, त्यापासून काय धोका संभवतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा,’ यासाठी एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीमने याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. रॅनसमवेअरचा धोका कसा टाळता येऊ शकतो, याची माहिती वेबकास्टच्या माध्यमातून दिली जाणार आहे. कॉम्प्युटर वापरणाऱ्या व्यक्तींना रॅनसमवेअरपासून सुरक्षित राहता यावे, यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीपत्रकातून देण्यात आली आहे.
‘WannaCry नावाचा नवा रॅनसमवेअर वेगाने पसरतो आहे. WannaCry विंडोजवरील फाईल्स इनक्रिप्ट करतो. हा रॅनसमवेअर विंडोज सिस्टम्समध्ये पसरतो. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी इंडियन कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीमकडून केले जाणार वेबकास्ट पाहा,’ असे आवाहन मेलच्या माध्यमातून सरकारने नागरिकांना केले आहे. शुक्रवारी जगभरातील ९९ देशांमध्ये ७५,००० रॅनसमवेअर हल्ले झाले. जगभरातील संस्थांना या हल्ल्याचा फटका बसला आहे. ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणा या हल्ल्यामुळे कोलमडली आहे.
