शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अतिशय नाजूक असून सर्वत्र नागवला जात असलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. हा संदेश सरकापर्यंत पोहचावा म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची अस्थी व रक्षा कलश घेऊन यात्रेला निघालेल्या शेतकऱ्याला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यास मज्जाव करून असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
सांगलीतील शेतकरी विजय जाधव हे रविवारी गडकरी यांना भेटण्यासाठी नागपुरातील निवासस्थानी गेले, परंतु गडकरी यांच्या स्वीय सचिवाने जाधव यांना भेटू दिले नाही. जाधव सकाळी ६ वाजता गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि रस्त्यावर बसून गडकरी यांना भेटण्याची वाट पाहत होते. सुरक्षा रक्षकांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास चौकशी केली आणि स्वीय सहायकांना भेटण्याची सूचना केली. गडकरी घरी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. साहेब घरी आहेत, मला भेटू द्या, अशी विनंती शेतकऱ्याने केली. परंतु मला बाहेर सांगण्यात आले, असे संदेश यात्रेवर निघालेले शेतकरी विजय जाधव यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी संकटात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. संकटग्रस्त शेतक ऱ्यांचे दु:ख राज्यातील मंत्र्यांनी ऐकून कर्जमाफी द्यावी, या उद्देशाने विजय जाधव यांनी ६ मे रोजी कोल्हापूर ते नागपूर अशी शेतकरी आत्महत्या अस्थी कलश यात्रा सुरू केली.
