रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना कायमच नवनवीन सुविधा दिल्या जातात. यामध्ये आणखी एक भर पडली असून रेल्वे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान आपल्या आवडीच्या मालिका आणि चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे दिर्घकाळाचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
प्रवाशांना दूरच्या पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास अनेकदा १० ते २५ तास इतका काळ रेल्वेमध्ये रहावे लागते. अशावेळी हा प्रवास कंटाळवाणा होऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून रेल्वेने ही अनोखी शक्कल लढवली आहे. प्रवासादरम्यान मनोरंजन हवे असल्यास रेल्वे प्रशासनाकडून मालिका आणि चित्रपट दाखविण्याची नवीन सुविधा सुरु करणार आहे. ही सुविधा लॅपटॉप, मोबाईल आणि इतर साधनांवर दिली जाणार असून त्यासाठी प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
याबाबत माहिती देताना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेमध्ये लोकप्रिय झालेल्या मालिका, चित्रपट आणि संगीत उपलब्ध होऊ शकेल. हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या चित्रपटांबरोबरच स्थानिक चित्रपट देण्याचाही प्रयत्न कऱणार आहे. याशिवाय काही गाजलेल्या परदेशी मालिका आणि कॉमेडी शोचे भागही उपलब्ध करुन दिले जातील. या उपक्रमामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल असेही ते म्हणाले.
सुरुवातीला ही सुविधा राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि हमसफर या रेल्वेमध्ये दिली जाणार आहे. कालांतराने इतर रेल्वे आणि स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. हा नवा प्रकल्प एका रेल्वेमध्ये सुरु करण्यासाठी साधारण २५ लाख रुपये इतका खर्च येणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय रेल्वेमध्ये रेडिओ सेवाही दिली जाणार असून ती पूर्णपणे मोफत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
