माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र सोमवारी ही सावली आपली साथ सोडणार आहे. आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याचा अनुभव सोमवारी, १५ मे रोजी दुपारी मुंबईकरांना घेता येणार आहे. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.
सावली ही आपली पाठ सोडत नाही. पण निसर्ग आणि भूगोलातील काही घडामोडींमुळे सावलीही आपली पाठ सोडणार असल्याचा अनुभव मुंबईकरांना सोमवारी मध्यान्ही म्हणजे ठीक १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने सावली अगदी पायाशी आल्याने अदृश्य होणार आहे, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. माणसाची सावली अदृश्य होण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत ‘शून्य सावली दिवस’ (झिरो शॅडो डे) असे म्हटले जाते. वर्षांतून दोन वेळा आपल्याला हा अनुभव घेता येतो.
