जम्मू-काश्मीरचे आरोग्यमंत्री चौधरी लाल सिंह एका महिला डॉक्टरची कॉलर पकडल्याने वादाच्या भोव-यात सापडले आहेत. महिला डॉक्टरची कॉलर पकडत असल्याचे त्यांचे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
भाजप आमदार आणि आरोग्यमंत्री चौधरी लाल सिंह अमरनाथ यात्रा सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाची तयारी तपासण्यासाठी लखनपूर येथील सरकारी रुग्णालयात गेले होते.
त्यावेळी त्यांचे एका महिला डॉक्टरच्या अॅप्रनच्या कॉलरवर लक्ष गेले. कॉलर नीट बसलेली नसल्याने त्यांनी स्वत:च्या हाताने ती कॉलर नीट केली. आरोग्य मंत्र्यांच्या या कृतीचे त्यावेळी तिथे उपस्थित असणा-या कॅमरामनने छायाचित्र टिपले.
हे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यापासून चौधरी लाल सिंह यांच्यावर टीका सुरु आहे. आरोग्य मंत्र्यांच्या या कृतीवर महिला डॉक्टरने आक्षेप घेतलेला नाही तसेच त्यांनी अयोग्य पध्दतीने स्पर्श केलेला नाही असे या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
आरोग्य मंत्री महिला डॉक्टरची कॉलर नीट करत असताना तिथे उपस्थित असलेल्या दुस-या महिला डॉक्टरने स्वत:च्या हाताने आपल्या अॅप्रनची कॉलर नीट केली. यावेळी तिथे अनेक जण उपस्थित होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एका महिला डॉक्टरने चौधरी लाल सिंह यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

