रेल्वेच्या बुकिंग क्लार्कची अधिका‍ऱ्याला मारहाण

वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अकस्मात तपासणीसाठी कोपर स्थानकात गेलेले मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता यांना बुकिंग क्लार्क सतीश जोसेफ याने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १०.३०च्या सुमारास घडली. यात गुप्ता यांच्या डोळ्याला तसेच चेह‍‍ऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी जोसेफला अटक केली आहे, तर रेल्वे प्रशासनाने जोसेफला निलंबित करून विभागीय चौकशी सुरू केली आहे.

कोपर स्थानकात बुकिंग क्लार्क असलेला सतीश जोसेफ हा कामावर वारंवार गैरहजर राहतो, प्रवाशांकडून अधिक पैसे घेतो आणि जाब विचारणा‍ऱ्या प्रवाशांना शिवीगाळ करत असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या. कर्मचा‍ऱ्यांनी देखील जोसेफविरोधात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने संजय गुप्ता यांनी सोमवारी रात्री १०.३० वाजता कोपर स्थानकात अकस्मात भेट दिली असता बुकिंग काऊंटरवर लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात काम करणारा निखील रणदिवे तिकीट बुकिंग करत होता, तर जोसेफ बाजूला बसला होता. गुप्ता यांनी याबाबत चौकशी करत बुकिंग क्लार्क व्यतिरिक्त इतर कोणीही आत थांबू नका, असे सांगताच चिडलेल्या जोसेफने गुप्ता यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता लोखंडी रॉडने त्यांच्या डोळ्यावर प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या गुप्ता यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *