आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असलेला अकरा वर्षांचा मुलगा अभ्यासाकडे लक्ष देत नसल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान होणार या चिंतेने आईने सोमवारी त्याच्या डोक्यात पाटा घातला आणि नंतर स्वतःचे डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोघांवर उपचार सुरू असून, मुलाची प्रकृती गंभीर आहे.
हर्षवर्धन अजित चव्हाण (वय ११, रा. गणपती निवास, गुरुवार पेठ) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याची आई अंजली चव्हाण (वय ३२) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाचे वडील अजित चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धनचे वडील इस्टेट एजंट आहेत. आई उच्चशिक्षित असून, गृहिणी आहे. हर्षवर्धनला एक बहीण आहे. तो न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहावीत शिकतो. त्याने २०१५ मध्ये पोहण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. २०१६मध्ये रशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची निवड झाली होती.
पोहण्याच्या सरावामुळे हर्षवर्धनचे अभ्यासात लक्ष लागत नसे. त्यामुळे त्याची आई, अंजली यांना हर्षवर्धनच्या भविष्याची चिंता होती. त्यातूनच त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे त्याचा अभ्यासही त्यांना घेता येत नव्हता. सोमवारी सकाळी हर्षवर्धनचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी तो आणि अंजली दोघेच घरी होते. त्या वेळी अंजली यांनी नैराश्यातून हर्षवर्धनच्या डोक्यात दगडी पाटा घातला. त्यानंतर स्वतः पाट्यावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वेळाने हर्षवर्धनचे वडील घरी आले, तेव्हा त्यांना दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी दोघांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
त्यानंतर हा प्रकार समोर आला. हर्षवर्धन गंभीर जखमी असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आईवरही उपचार सुरू आहेत. खडक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खडक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक व्ही. डी. केसरकर अधिक तपास करत आहेत.
