इंडोनेशिया येथे मंगळवारी दुपारी हवाई दलाचे विमान कोसळल्याने भीषण अपघात झाला. यात ११६ जण ठार झाले आहेत. रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हर्क्युलस सी-१३० हे विमान इंडोनेशियातील सुमारे २० लाख लोकसंख्या असलेले प्रमुख शहर मेडन येथील रहिवासी भागात कोसळले.
या अपघातात काही इमारतींसह अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. इमारतीमधील रहिवाशांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र या अपघाताची भीषणता पहाता यात मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाल्याचे समजते.
विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटातच विमानाला अपघात झाला. १२ वाजून आठ मिनिटाने या विमानाने उड्डाण घेतले होते. तर विमानतळापासून पाच किलोमीटरचे अंतर पार करताच (तीन मैल) १२ वाजून १० मिनिटानी हे विमान कोसळले. या लष्करी विमानात १२ क्रू सदस्य आणि अन्य ३१ जण होते.
घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे अदम मलिक रुग्णालयाच्या प्रवक्त्या सैरी एम. सरागिह यांनी सांगितले. लष्करी साहित्य पुरविण्यासाठी या विमानाचा वापर केला जात होता.

