मोदींचा ‘क्लीन मनी पार्ट – २’!; ‘त्या’ ६० हजार खातेधारकांची चौकशी होणार

ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसऱ्या टप्प्यात आयकर विभागाकडून ६० हजार लोकांची चौकशी करण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर काळा पैसा उजेडात आणण्याचे प्रयत्न आयकर विभागाकडून केले जात आहेत. आयकर विभागाच्या धोरणात्मक कामकाजाची जबाबदारी असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने ९ नोव्हेंबर २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ९ हजार ३३४ कोटींचा काळा पैसा उघड केल्याची माहिती दिली आहे. आता या कारवाईचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये तब्बल ६० हजार लोकांची चौकशी आयकर विभागाकडून केली जाणार आहे.

‘नोटाबंदीनंतरच्या कालावधीत मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या, अधिक रकमेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. मोठ्या रकमेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा ६ हजारांहून अधिक आहे. तर अधिक रक्कम पाठवली गेल्याची ६,६०० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या प्रकरणी एकूण ६० हजार लोक रडारवर आहेत. ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसऱ्या टप्प्यात या लोकांची चौकशी केली जाणार आहे’ असे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने म्हटले आहे. ‘यासोबतच पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न दिलेल्या अनेकांची दुसऱ्या टप्प्यात कसून चौकशी करण्यात येणार आहे,’ असेही केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसऱ्या टप्प्यातील कारवाईआधी बँक खात्यांचा तपशील तपासण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणारे, अधिक रकमेच्या उलाढाली करणारे आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसऱ्या टप्प्यात नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणारे लोक आयकर विभागाच्या निशाण्यावर असणार आहेत. या लोकांची चौकशी आयकर विभागाकडून करण्यात येणार आहे.

ऑपरेशन क्लिन मनीच्या पहिल्या टप्प्यातील कारवाई ३१ जानेवारीला पार पडली. या कारवाईदरम्यान आयकर विभागाने एकूण १७.९२ लाख लोकांची चौकशी केली. यामधील ९.४६ लाख लोकांची चौकशी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. तर इतरांची चौकशी ऑनलाइन करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *