मालकिणीच्या रक्षणासाठी श्वानाचे बलिदान

आपल्या धन्यावर शेजाऱ्याकडून सुऱ्याने हल्ला होत असल्याचे पाहून विजेच्या वेगाने या दोघांच्या मध्ये झेप घेत धन्याचा वार स्वत:वर झेलणाऱ्या श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी अँटॉप हिल भागात घडली.

सुमती तंगवेल ही महिला अ‍ॅन्टॉप हिलमधील मक्कावाडी कोळीवाडा झोपडपट्टीत आपल्या भावासोबत राहते. तिच्याकडे ‘लकी’ नावाचा १३ महिन्याचा श्वान होता. या भागातील मुलांनी रस्त्यावर भटकणाऱ्या लकीला सुमतीकडे आणले होते. तेव्हापासून तो सुमतीच्या घरचा सदस्य बनून गेला. अगदी १५ दिवसांचा असल्यापासून सुमती लकीचा सांभाळ करत होती. मात्र रविवारी शेजाऱ्यांच्या भांडणात या श्वानाचा अकारण बळी गेला.

रविवारी रात्री ११ च्या सुमारास सुमतीच्या शेजारी राहणाऱ्या व्यंकटेश देवेंद्र याचे त्याची वहिनी रोझी देवेंद्र हिच्याशी कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की व्यंकटेश रोझीला मारहाण करू लागला. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी रोझी सुमतीच्या घरात शिरली. व्यंकटेशही सुरा घेऊन सुमतीच्या घरात शिरला. ते पाहून सुमती रोझीला वाचवण्यासाठी मध्ये उभी राहिली असता व्यंकटेश तिच्या अंगावर धावून गेला. हे पाहताच लकीने व्यंकटेशच्या अंगावर उडी मारली. तेव्हा व्यंकटेशने अंगावर आलेल्या लकीच्या पोटातच सुरा खुपसला.

लकी रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्यानंतर व्यंकटेशने तेथून पळ काढला. रक्तबंबाळ झालेल्या लकीला सुमतीने परळ येथील बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रुग्णालय गाठले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. सुमतीने या रुग्णालयातच लकीवर अंत्यसंस्कार केले.

सुमतीने व्यंकटेश विरोधात अ‍ॅन्टॉप हिल रुग्णालयात गुन्हा नोंदविला आहे. त्याच्याविरोधात पाळीव प्राण्यांची हत्या केल्याप्रकरणी कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी व्यंकटेशला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *