डोकेदुखी म्हणजे अॅस्पिरिन. आपल्या देशात काही गोष्टींची सांगड काही दुसऱ्या गोष्टींशी एवढ्या घट्टपणे घातली गेली आहे की एक शब्द उच्चारला की लगेच दुसऱ्याची आठवण यावी. म्हणजे बिसलेरी, अमूल बटर, ग्लुको बिस्किट, टाटा साॅल्ट अशा कितीतरी वस्तूंची यादी काढता येईल. तसंच अॅस्पिरिन, अॅनासीन आणि क्रोसीन ही औषधं डोकेदुखीशी जोडली गेली आहेत.
पण आता अॅस्पिरिनचा आणखी एक उपयोग व्यवहारात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आयआयटी मद्रासच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार अॅस्पिरिनचा वापर कॅन्सर बरा करण्यासाठीही होऊ शकतो. आपलं हे संशोधन त्यांनी ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलं आहे.
कॅन्सरच्या प्रकारापैकी धोकादायक प्रकारात कॅन्सरच्या पेशींमधलं प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. या पेशींवर अॅस्पिरिन हल्ला करून त्यांचा नायनाट करायला मदत करतात असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
याचा अर्थ अॅस्पिरिन घेऊन कॅन्सर लगेच बरा होईल असा बिलकुल नाही. पण या औषधामध्ये कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करणारी तत्व सापडली आहेत असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
हे सर्वमान्य झाल्यास कॅन्सरच्या उपचारांमध्ये मोठी क्रांती होऊ शकते. भारताता कॅन्सरच्या रूग्णांची संख्या मोठी आहे. दरवर्षी पाच लाखांहून जास्त लोकांचा कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. कॅन्सरवरच्या उपचारांचा खर्चही प्रचंड आहे. जवळजवळ पावणेदोन लाखांचा खर्च येणारे हे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात. जर अॅस्पिरिनवर आधारित कॅन्सवरची उपचार प्रणाली विकसित झाली तर या खर्चात कितीतरी घट होऊन लाखो लोकांना त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या कॅन्सरशी दोन हात करता येतील.
