हॉटेलमधील १३० रुपयांच्या टीपवरुन एका वेटरची हत्या झाल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली. राजू (२५) असे या मृत्यू झालेल्या वेटरचे नाव असून राजू हा मूळचा महाराष्ट्रातील असल्याचे समजते.
हैदराबादमधील कांचनबागमधील स्पाईस बावर्ची रेस्टॉरंटमध्ये राजू हा तीन दिवसांपूर्वीच कामाला लागला होता. तर याच हॉटेलमध्ये कमलेश उर्फ कमल हा १० दिवसांपूर्वी स्वयंपाकी (कुक) म्हणून कामाला लागला होता. कमल हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. राजू हा काम संपल्यावर परिसरातील गार्डनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर झोपायचा. तर कमल हा हॉटेलमध्येच झोपायचा. हॉटेलमध्ये काम संपल्यावर दिवसभरात मिळालेल्या टीपचे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समान वाटप व्हायचे.
राजूने टीपमधील १३० रुपये चोरल्याचा कमलला संशय होता. सोमवारी सकाळी राजू कामासाठी हॉटेलमध्ये येत असताना कमलने त्याला हॉटेलबाहेरच अडवले. १३० रुपये दिल्याशिवाय आत जाऊ देणार नाही अशी धमकीही त्याने राजूला दिली. यावरुन राजू आणि कमलमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नंतर दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. यादरम्यान कमलने राजूला जोरात धक्का दिला. यात राजूला खाली पडला. अंतर्गत दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला. यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हॉटेल मालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी कमलला ताब्यात घेतले आहे. भारतीय दंड विधानातील कलम ३०४ अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
