कॅलिफोर्नियात माथेफिरु पतीचा शाळेत गोळीबार

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला असून मृतांमध्ये शिक्षिकेचा समावेश आहे. माथेफिरु पतीने पत्नीची हत्या करण्यासाठी हा गोळीबार केला असून पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

कॅलिफोर्नियामधील शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका कॅरेन स्मिथ यांचा सेड्रीक अँडरसनशी विवाह झाला होता. मात्र महिनाभरापूर्वीच ते विभक्त झाले होते. याच रागातून सोमवारी अँडरसन स्मिथ यांच्या शाळेत धडकला. पत्नीला काही सामान द्यायचे आहे असे सांगत त्याने शाळेत प्रवेश मिळवला. शाळेत स्मिथ शिकवत असलेल्या वर्गात अँडरसन पोहोचला आणि बंदूक काढून पत्नी स्मिथवर गोळी झाडली. या गोळीबारात स्मिथ यांच्याजवळ थांबलेले दोन विद्यार्थीही गंभीर जखमी झाले. स्मिथ आणि दोन्ही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान स्मिथ आणि एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर एक विद्यार्थी अजूनही जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थी हा ९ वर्षाचा आहे. पत्नीवर गोळीबार केल्यावर अँडरसनने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

कॅरेन स्मिथ यांच्या आईने एका स्थानिक प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया दिली आहे. अँडरसन आणि स्मिथ हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि महिनाभरापूर्वीच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असे स्मिथ यांच्या आईने म्हटले आहे.

१५ विद्यार्थी आणि अन्य एका शिक्षिकेच्या डोळ्यादेखतच हा सर्व प्रकार घडला. शाळेतील गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. चिंताग्रस्त पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली. गोळीबाराच्या आवाजानंतर शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना तातडीने घराबाहेर काढण्यात आले. या घटनेच्या वेळी शाळेत सुमारे ६०० विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, अमेरिकेत शाळेत गोळीबाराच्या वर्षाला सरासरी ५२ घटना घडतात. त्यामुळे गन व्हायलन्सचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकेत शस्त्रास्त्र परवाना सहज मिळत असून बंदूक, पिस्तूल बाळगणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अमेरिकेत गोळीबारात वर्षाता १० हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *