टीएमटीचे गावदेवी रस्त्यावर अतिक्रमण

टीएमटीचे गावदेवी रस्त्यावर अतिक्रमण

ठाणे महापालिका प्रशासनाने रस्त्यावर बेकायदा पार्किंग करणा-यांवर कारवाईचे संकेत दिलेले आहेत. असे असताना ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडूनच गावदेवी रस्त्यांवर बसेस उभ्या करण्यात येत आहेत. या बसेसमुळे गावदेवी मैदानाकडून रेल्वे स्थानक परिसरात जाणा-या वाहनांची कोंडी होत असते. टीएमटीकडूनच करण्यात येणा-या या अतिक्रमणावर कारवाई कोण करणार असा सवाल करण्यात येत आहे.

ठाणे स्टेशन परिसरात बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गावदेवी मैदान परिसरात बसस्थानक तयार करण्यात आलेले आहे. या स्थानकातून इतर मार्गावर बसेस सोडण्यात येतात. मात्र, या स्थानक परिसरात बसेस उभ्या न करता चालक मंडळी गावदेवी रस्त्यावर कुठेही बसेस उभ्या करत आहेत. ठाणे शहरातून स्थानक परिसरात येण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या परिसरात इतर वाहनांची वर्दळ असते. त्यात आता गावदेवी रस्त्यांवर बसेस उभ्या करण्यात येत असल्याने सकाळी व सायंकाळी मोठीच कोंडी होत असते. या रस्त्यावर खोपट, शिवाईनगर परिसरात जाण्यासाठी एक रिक्षास्टँड आहे. रिक्षा पकडण्यासाठी सकाळी व सायंकाळी प्रवाशांची गर्दी असते. त्यातच या स्टँडजवळच टीएमटीच्या बसेस उभ्या करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडत असते. याबाबत टीएमटी बसचालकांना नागरिकांनी सांगण्याचा प्रयत्न करता त्यांना उलट उत्तरे मिळत असतात. त्यामुळे टीएमटीच्या या अतिक्रमणामुळे या परिसरातील नागरिक हैराण झालेले आहेत. गावदेवी रस्त्यात कुठेही उभ्या करण्यात येणा-या बसेसबाबत टीएमटी प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरत आहे.

वाहतूक कोंडी करण्याचा अधिकार टीएमटीला कोणी दिला आहे. महापालिकाच कायदा धाब्यावर बसवत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे अशा रस्त्यात कुठेही गाडय़ा लावणा-यांना आवरण्याची गरज  आहे. – दिनेश पुजारी

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

ठाणे शहरात कुठेही रिक्षा वा अन्य वाहन उभे राहिल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. टीएमटीकडून या रस्त्यावर उभ्या करण्यात येणा-या बसेसवर वाहतूक पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *