आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज फेडण्याची मुदत मंगळवारी संपत असतानाच देशात भांडवली नियंत्रण आणून आर्थिक आणीबाणी लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळपासून देशभरातील बँका आणि एटीएम बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर एटीएम कार्ड नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शनच्या आशेने बँकांबाहेर मोठमोठय़ा रांगा लावल्या होत्या. गेल्या पाच वर्षाच्या या आर्थिक संघर्षाला यामुळे वेगळी कलाटणी मिळाली आहे.
बँकांचे दरवाजे उघडतील आणि या महिन्याचे पेन्शन मिळेल या आशेने पेन्शनधारकांनी या रांगा लागल्या होत्या. दरम्यान अर्थखात्याने पेन्शन कशा पद्धतीने द्यायचे हे दुपारनंतर ठरेल असे म्हटले होते. शनिवारी पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी वित्तपुरवठादारांच्या प्रस्तावावर सार्वमत घेण्याची घोषणा करताच ग्रीक नागरिकांनी बँक शाखा आणि एटीएमवर धाव घेतली आणि बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वमताची प्रक्रिया रविवारी सुरू करण्यात आली असून ग्रीक नागरिकांना प्रस्तावाविरोधात मत देण्याचा सरकारकडून सल्ला देण्यात आला आहे.
सरकारने दिवसभरात एटीएममधून ६० युरो प्रति व्यक्ती काढण्याची मर्यादा ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर एटीमएम मशीन उशिरा सुरू होणार असून बँका मात्र सहा दिवस बंदच राहतील. ग्रीक बँकांतून पैसा काढण्यावर निर्बंध आणून ग्रीसच्या आंतरराष्ट्रीय बेलआऊटची मुदत मंगळवारी संपण्याआधी देशाच्या वित्तपुरवठादारांनी सवलत बहाल करण्यासाठी हे भांडवली नियंत्रण लागू करण्यात आले आहे.
युरोपला तडजोडीची गरज
बर्लिन- ग्रीकमधील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर युरोपने काही प्रमाणात तडजोडीचा मार्ग पत्करण्याची गरज आहे. युरो अपयशी ठरला तर युरोप घसरेल, असा इशारा जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मर्केल यांनी सोमवारी दिला. मात्र त्याच वेळी युरोपीय संघाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्त्वांना मुरड घालू नये असेही जोर देऊन सांगितले. युरोपीय संघ आणि आयएमएफच्या कर्जाबाबत ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. या पार्श्वभूमीवर मर्केल म्हणाल्या की तोडगा काढण्याची क्षमता गमावणे म्हणजे युरोप गमावण्यासारखे आहे. याही स्थितीत त्यांना एक शेवटी संधी दिली जाऊ शकते.

