पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील याप्रकरणी पोलंडमधील भारतीय दुतावासाकडून अहवाल मागवला आहे. वर्णभेदातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलंडमधील पोझनानमध्ये ट्राममध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने हल्ल्यापूर्वी पोलिश भाषेत तरुणाला उद्देशून काही विधान केले आणि यानंतर त्याने तरुणाला बेदम मारहाण केली. तीक्ष्ण हत्यारांनी त्याच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याने मदतीसाठी एका मित्राला फोन केला. मित्राने स्थानिकांच्या मदतीने जखमी तरुणाला रुग्णालयात भरती केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ‘मी घटनास्थळावरुन जात असताना एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. हल्लेखोर त्याच्यावर हल्ला करुन पळून जाताना बघितले. पण हल्लेखोराचा चेहरा मला दिसला नाही’ असे एका प्रत्यक्षदर्शीने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. पोलिसांनी जखमी तरुणाची विचारपूसही केली. जखमी विद्यार्थ्याला पोलिश भाषा येत नसल्याने पोलिसांना जबाब घेण्यात अडचण आली असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा होता. त्या आधारे आता तपास सुरु आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय तरुणाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील या घटनेची दखल घेतली आहे. पोलंडमधील भारतीय दुतावासाकडून या घटनेप्रकरणी अहवाल मागवण्यात आला आहे. हल्ल्यात तरुण जखमी झाला असून या घटनेचा तपास सुरु आहे असे सुषमा स्वराज यांनी ट्विटवर सांगितले. पोलंडमध्ये परदेशी नागरिकावर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. गेल्यावर्षी सीरियातून आलेल्या विद्यार्थ्यावर हल्ला झाला होता.