गेल्या सहा वर्षांपासून भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्वानावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्वानाच्या दातावर शस्त्रक्रिया झाली असून उपचारानंतर त्याला सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा पथकात नऊ वर्षाच्या लॅब्रोडरचाही समावेश आहे. अत्याधुनिक स्फोटके शोधण्यात हा श्वान प्रसिद्ध असून त्याला गृहमंत्रालयाने पारितोषिकही दिले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यातील सर्वात महागडा श्वान म्हणून त्याला ओळखले जाते. या श्वानाला १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते. याचा वापर त्याच्या प्रशिक्षण आणि संगोपनासाठी करण्यात आला होता. या श्वानाच्या तोंडात गाठ आली होती. यामुळे त्याला खाण्यात अडचण येत होती. शेवटी त्याला लुधियानातील गुरु आनंददेव पशूवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. श्वानाच्या तोंडातील गाठ काढण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. आनंद देव यांनी दिली.
निमलष्करी दलातील जवान या श्वानाला घेऊन रुग्णालयात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव याविषयी माहिती देता येणार नाही अशी माहिती या जवानांनी दिली. श्वानावरील शस्त्रक्रियेसाठी ८०० रुपये घेण्यात आले. याशिवाय औषधांसाठी वेगळे शुल्क आकारण्यात आले असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. श्वानाला कर्करोग झाला होता का याचीही तपासणी केली जाणार आहे. गाठ काढण्यात आली असून त्याची तपासणी केली जाईल. कर्करोग आढळल्यास श्वानावर विशेष उपचार करावे लागतील आणि देखभालही करावे लागेल असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.