कोहलीची ‘विराट’ कमाई, एका दिवसासाठी 5 कोटी रुपये

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या सर्व नव्या करारांसाठी एंडोर्समेंट फी वाढवली असून एका दिवसांसाठी पाच कोटी रुपये केली आहे. कोणत्याही सेलिब्रेटीकडून आकारण्यात येणा-या एंडोर्समेंट फी मध्ये ही सर्वाधिक आहे. यासोबतच विराट कोहली इंटरनॅशनल स्पोर्ट्स स्टार्सच्या लीगमध्ये सामील झाला आहे.
गेल्यावर्षी पर्यंत कोहली एका दिवसासाठी अडीच ते साडे तीन कोटी रुपये मानधन आकारत होता. पेप्सिकोसोबत असलेल्या कराराच्या नुतनीकरणाआधी विराट कोहलीने आपल्या मानधनात वाढ केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीतपेयामुळे आरोग्याला पोहोचणा-या हानींमुळे पेप्सिकोसोबत असलेल्या आपल्या कराराचं नुतनीकरण करायचं की नाही यबाबत विराट कोहली साशंक आहे.
कोहलीचं प्रतिनिधित्व करणारी एजन्सी कॉर्नरस्टोन स्पोर्टने विराट कोहलीच्या मानधनावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. ‘विराट कोहलीचा पेप्सीसोबत असलेला करार 30 एप्रिलपर्यंत आहे. आम्ही सर्व कंपन्यांशी करार वाढवण्याआधी मानधनावर चर्चा करत आहोत. पेप्सीसोबत आमचे जुने संबंध असून ते पुढेही तसेच राहतील अशी अपेक्षा असल्याचं’, कॉर्नरस्टोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सजदेह यांनी सांगितलं आहे.
कोहलीसोबत जोडल्या गेलेल्या दोन ब्रॅण्ड्सच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी विराट कोहलीच्या मानधनात वाढ झाली असल्याचं मान्य केलं आहे. विराट कोहलीचं मानधन धोनी यशाच्या शिखरावर असताना होती त्यापेक्षाही जास्त असून त्याने अभिनेते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांनाही मागे टाकलं आहे. गेल्यावर्षी पेप्सिकोने धोनीसोबतचा आपला 11 वर्षाचा करार समाप्त केला होता.
पेप्सिको कोहलीसोबत आपला करार वाढवण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या त्यांना मार्केटमध्ये खूप झगडावं लागत असल्याने कोहली पेप्सिकोमधून बाहेर पडल्यास आश्चर्य वाटणार नाही असं मार्केट तक्ष सांगतात. सेलिब्रेटी सध्याच्या घडीला फक्त एकाच प्रोडक्टसाठी काम करत नसून अनेकांशी जोडले गेले आहेत. विराट कोहली ऑडी लक्झरी कार, एमआरएफ टायर, टिसॉट वॉच, जिओनी फोन, कोलगेट टूथपेस्ट सारख्या प्रोडक्टसाठी एंडोर्समेंट करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *