खेळता खेळता गिळलं पेनाचं टोपण, 9 वर्षांनी काढलं बाहेर

खेळताना मुलं अनेकदा काहीतरी पराक्रम करुन ठेवतात आणि मग आई वडिलांची धावपळ सुरु होते. मुलांकडे दुर्लक्ष करणं पालकांसाठी अनेकदा महागात पडू शकतं. असंच काहीसं बंगळुरुतील रेणुका हरलापूरसोबत झालं होतं. रेणुका जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हा खेळताना तिने टोपण गिळलं होतं. मात्र आपण टोपण गिळल्याचं तिला कळलंच नाही. गेली नऊ वर्ष तिला खोकल्याचा प्रचंड त्रास होता होता. पण हे कशामुळे होत होतं हे वारंवार तपासणी करुनदेखील कळलं नव्हतं. अखेर तिच्या पोटात टोपण असल्याचं लक्षात आलं. तब्बल नऊ वर्षांनी सर्जरी केल्यानंतर हे टोपण बाहेर काढण्यात आलं.

कर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यात राहणा-या रेणुका हरलापूर गेल्या नऊ वर्षांपासून खोकला आणि कफमुळे त्रस्त होती. तिच्या थुंकीतूनही दुर्गंध येत होता. अनेकदा रुग्णालयाच्या फे-या मारुनही तिला काहीच फायदा होत नव्हता. उलट तिची प्रकृती अजून खराब होऊ लागली होती. मात्र मंगळवारी अखेर जेव्हा डॉक्टरांनी तिच्या फुफ्फुसातून पेनाचं टोपण बाहेर काढल्यानंतर तिला आराम मिळाला. सरकारी रुग्णालय राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसीजच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले.
डॉक्टर शशिधक बग्गी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या सर्जरीमध्ये फुफ्फुसाच्या कोप-यातून हे टोपण काढण्यात यश मिळालं. गेल्या नऊ वर्षांपासून पोटात असलेल्या या टोपणामुळे रेणुकाला श्वास घेताना त्रास होत होता. डॉ शशिधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘खोकला आणि दुर्गंधी थुकीमुळे संसर्ग झाल्याची शंका होता. यामुळे फुफ्फुसालाही नुकसान होण्याची शक्यता होती. पण एक्स-रे काढला असता असं काही दिसलं नाही. मात्र एक डार्क स्पॉट दिसत होता. आम्ही एन्डोस्कोपीच्या माध्यमातून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही. त्यामुळे आम्हाला शेवटी ऑपरेशन करावं लागलं’.
रेणुकाचे आई- वडिल मजूर आहेत. आजपर्यंत अनेक डॉक्टरांकडे त्यांनी तपासणी केली, मात्र कोणीही निदान करु शकलं नाही. मुलीची तब्बेत खराब होत असल्याने त्यांना चिंता लागली होती. ऑपरेशन नंतर आता रेणुकाची प्रकृती चांगली असून सुधारत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *