बोरिवली पश्चिम येथील हरिलाल भगवती रुग्णालय येथे नव्याने बांधण्यात येणा-या महापालिका परिचारिका विद्यालयाला अरूणा शानबाग यांचे नाव देण्यात येणार आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
केईएम रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवेत असलेल्या अरूणा शानबाग अमानुष कृत्याचा बळी ठरल्या. त्या ४२ वर्षे कोमात होत्या. अखेर १८ मे २०१५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यामुळे महापालिकेची परिचारीका म्हणून त्यांचे नाव चिरंतन रहावे, यासाठी माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांना पत्र दिले होते.
यामध्ये बोरिवली येथील भगवती रुग्णालय येथे नव्याने बांधण्यात येणा-या महापालिकेच्या परिचारीका विद्यालय इमारतीस ‘अरूणा शानबाग’ यांचे नाव देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार हा विषय गटनेत्यांच्या सभेपुढे ठेवण्यात आला असता या प्रस्तावाला सर्वानीच पाठिंबा दिल्यानंतर अरूणा शानबाग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

