महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी सहज तुटून हातात न आल्याने भरधाव दुचाकीवरील चोरांनी तिला २५ फूट अंतरापर्यंत फरफटत नेल्याची संतापजनक घटना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय मार्गावर शनिवारी घडली. या घटनेत महिलेला दुखापत झाली आहे.
४९ वर्षीय महिला शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना तिच्या मागून भरधाव दुचाकीवरील मागील चोरटय़ाने तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. परंतु या प्रकाराने सावध झालेल्या महिलेने मोठय़ा शिताफीने चोराचा टीशर्ट पकडला आणि सोनसाखळी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी चालवत असलेल्या चोराने तिचा प्रतिकार झिडकारून दुचाकी वेग वाढवला. त्यासरशी महिला तब्बल २५ फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. काहीकाळ तिने आपल्या हातात सोनसाखळी घट्ट पकडली होती. पण दुचाकी वेग वाढल्याने ती खाली पडली. त्यामुळे तिच्या हातापायाला जखमा झाल्या. चोरटय़ांपासून दागिने वाचवण्याचा महिलेचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. ५५ हजार रुपयांचे दागिने हिसकावून चोरांनी तेथून पळ काढला.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई हाती घेत शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यातील एका चोराला जेरबंद केले. शफी अख्तर जाफरी (१९) असे त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार फरार आहे. या घटनेने सोनसाखळीचोर चोरीसाठी प्रसंगी महिलांच्या जिवावरही उठल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोनसाखळी चोरांनी महिलेला २५ फूट फरफटत नेले

