राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या इंग्रजी, मराठीच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी वाणिज्य शाखेच्या सेक्रेटरीयल प्रॅक्टिस या विषयाची प्रश्नपत्रिकाही व्हॉटसअपवर व्हायरल झाली. यामुळे या घटनेची मंडळाने तातडीने दखल घेत सायंकाळी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वाणिज्य शाखेच्या एसपीची परीक्षा शनिवारी सकाळी होती. वेळ ११ ची असताना प्रश्नपत्रिका १० वाजून ४७ मिनिटांनी व्हॉटसअॅपवर बाहेर आल्याने मोठी खळबळ उडाली. मंडळाने ही प्रश्नपत्रिका फुटण्याची गंभीर दखल घेतली. असे प्रकार यापुढे रोखण्यासाठी मंडळाकडून यापुढे भरारी पथकांसोबत निरीक्षक आणि मुख्याध्यापकांसह परीक्षा प्रमुखांनाही जबाबदार धरले जाणार आहे. परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांसोबत अथवा इतर व्यक्तींसोबत मोबाईल अथवा कॅमेरा कसा जातो याविषयी माहिती घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत सध्या राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू आहे. मराठीची परीक्षा सुरू होण्याआधीच म्हणजेच १० वाजून ४६ मिनिटांनी प्रश्नपत्रिका व्हॉटस अॅपवर व्हायरल झाली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अकरा वाजता परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येते. त्याच दरम्यान ही प्रश्नपत्रिका कोणीतरी व्हॉटस अॅपवर टाकली असण्याची शक्यता आहे. व्हॉट्स अॅपवर पेपर आढळून आल्याने अगोदरच चिंतेत असलेले मंडळ यातून सावरतोय तोच शनिवारी एसपीचा पेपर व्हॉटस अॅपवर आढळून आल्याने पुन्हा एकदा मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
बारावीच्या परीक्षेत एक गुणांचा प्रश्नच गाळला
बारावीचे पेपर व्हॉटसअॅपवर व्हायरल होत असतानाच शनिवारी बारावी एमसीव्हीच्या जनरल फाऊंडेशन कोर्स पेपर-२ मध्ये एक गुणाचा प्रश्नच प्रश्नपत्रिकेतून गाळण्यात आल्याची बाबही समोर आली आहे. याच विषयाच्या मराठीतील पेपरमध्ये मात्र तो प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मंडळाने या नव्या अडचणी उभ्या केल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या जनरल फाऊंडेशन पेपरमध्ये पहिल्याच गाळलेल्या जागा भरा या प्रश्नात ए, बी, सी हे उपप्रश्न असले तरी त्यात डी हा चौथा प्रश्न गाळण्यात आला असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर यात चूक करणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सिस्कॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी केली आहे.
