बदलापुरात १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

बदलापुरात आज एक दुर्देवी घटना घडली आहे, महिला दिनानिमित्त आयोजित सायकल शर्यतीदरम्यान सायकलवरून पडून १५ वर्षीय श्रेया म्हात्रे हिचा मृत्यू झाला. श्रेया देवेंद्र म्हात्रे ही बदलापुरातील कात्रप विद्यालयाची नववीची विद्यार्थीनी होती.

बदलापुरातील सखी या संस्थेच्या वतीने रविवारी  सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बदलापूर पूर्वेकडील खरवई येथे राहणारी श्रेयाही सहभागी होती.

श्रेया सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्पर्धेत सायकल चालवत होती. अंबरनाथ बदलापूर रस्त्यावरील डीमार्ट पासून सुरु झालेल्या या शर्यतीत  कात्रप भागातील एक्सीस बॅंकेसमोरील रस्त्यापर्यंत ती आली. तेथून पुढे जात असताना ती सायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झाली.

यानंतर श्रेयाच्या मागोमाग तिची आई मोटरसायकलवर येत होती. तिने तत्काळ श्रेयाला उपचारार्थ एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *