नायजेरियामध्ये तब्बल दोनशे जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या एका क्रूरकर्माचा पोलीस चकमकीत खात्मा झाला आहे. हेन्री चिबूझे असे या कुख्यात गुंडाचे नाव असून दरोडा, खंडणी, हत्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.
नायजेरियामध्ये हेन्री चिबूझे आणि त्याची टोळी ‘व्हॅम्पायर’ या नावाने ओळखली जायची. वयाच्या अकराव्या वर्षापासून हेन्री गुन्हेगारी मार्गाकडे वळला होता. यानंतर हेन्री चिबूझेने स्वतःची टोळी स्थापन केली होती. नायजेरियातील विविध भागांमध्ये गुन्हेगारी कृत्यांनी त्याने दहशत निर्माण केली होती. हेन्रीने स्वतःच्या गर्लफ्रेंडचीही निर्घृणपणे हत्या केली होती. गर्लफ्रेंडसोबतच त्याने तिच्या सहा मुलांचीही हत्या केल्याने खळबळ उडाली होती.
नायजेरियामध्ये दहशत निर्माण करणारा हेन्री चिबूझे पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. तो काही काळ तुरुंगामध्येही होता. पण जानेवारीमध्ये हेन्रीच्या साथीदारांनी तुरुंगावर हल्ला करत हेन्रीला सोडवले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. इकवेरेमधील घनदाट जंगलात हेन्री चिबूझे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी चोहोबाजूंनी घेरल्याचे लक्षात येताच हेन्री आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हेन्रीचा मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदारांना जीवंत पकडण्यात यश आले.
हेन्रीचा मृतदेह पोलीस मुख्यालयात आणताच स्थानिकांनी एकच जल्लोष केला. ‘आमच्या कुटुंबीयांना मारणा-याचा आज अंत झाला. यापेक्षा आम्हाला काहीच महत्त्वाचे नाही’ अशी भावनाही याप्रसंगी अनेकांनी व्यक्त केली. व्हॅम्पायर म्हणून ओळखल्या जाणा-या हेन्रीची दहशत आता इतिहास जमा झाली आहे अशी प्रतिक्रिया पोलीस खात्याचे प्रमुख जिमोह मोशूद यांनी दिली. पोलिसांनी हेन्रीच्या साथीदारांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
