ठाण्यात शिवसेनेचे आज शक्तिप्रदर्शन

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौर निवड

ठाणे महापालिकेच्या महापौर निवडीनिमित्त सोमवारी शिवसेनेने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. यानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच महापालिका मुख्यालयात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी भगवे झेंडे तसेच फलकांची उभारणी करत शिवसेनेने रविवारपासूनच वातावरणनिर्मिती करण्यावर भर दिला. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालय फुलांच्या माळांनी सजविण्यात आले असून उद्धव यांच्या उपस्थितीत नवनियुक्त महापौर, उपमहापौरांची शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभर भाजपला मोठे यश मिळत असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने प्रथमच एकहाती सत्तेचा पल्ला गाठला. मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपकडून जोरदार आव्हान उभे केले जात असताना ठाणे महापालिकेत ६७ नगरसेवकांचा आकडा गाठत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. या मोठय़ा विजयानंतरही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी फारसा जल्लोष करणे टाळले. सोमवारी होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडी निमित्ताने मात्र संपूर्ण शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेना नेत्यांनी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *