आणखी एका व्यावसायिकाची अमेरिकेत हत्या

अमेरिकेत गेल्या आठवड्यात भारतीय अभियंत्याची हत्या करण्याची घटना आणखी ताजी असतानाच भारतीय वंशाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

हर्नीश पटेल या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची साउथ कॅरोलिनामधील त्यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली. पटेल यांनी रात्री अकरा वाजून २४ मिनिटांनी त्यांचे दुकान बंद केले. त्यानंतरअवघ्या दहा मिनिटांनी लॅन्कस्टर येथील त्यांच्या घराबाहेरच त्यांना गोळ्या मारून ठार करण्यात आले. भारतीय अभियंता श्रीनिवास कुचीबोतला याच्या हत्येचा अमेरिकेचे राट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी ही घटना घडली.

एका महिलेने पोलिसांना फोन करून गोळीबाराचा आवाज ऐकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. त्यावेळी गोळी घालून पटेल यांचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी श्वान पथक मागवले. मात्र ते हल्लेखोराचा माग काढू शकले नाही.

पटेल यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असे वाटत नाही, मात्र सर्व शक्यता लक्षात घेऊन मारेक-यांचा शोध सुरू आहे असे तपास अधिका-यांनी सांगितले.

मात्र, तेथील नगरपाल बेरी फेल यांनी वांशिक वादातून हत्या होण्याचे कारण दिसत नाही, असे सांगून तशी शक्यता फेटाळल्याचे वृत्त  आहे. फेल यांच्या कार्यालयाशेजारीच पटेल यांचे दुकान असल्याने त्यांचे त्यांच्याकडे वरचेवर जाणे येणे होत असे. फेल यांनी महान कौटुंबिक माणूस असे त्यांचे वर्णन केले आहे.

दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांच्या हत्येनंतर ते राहत असलेल्या लॅन्कस्टर भागातील परिस्थिती तणावपुर्ण झाली आहे. हर्नीश पटेल तेथील भारतीय समुदायाचे महत्त्वाचे सदस्य होते. पटेल हे दयाळू वृत्तीचे होते. त्यांच्या ग्राहकांशी ते मित्रत्वाने वागत.

पटेल यांच्या मागे पत्नी आणि बालवाडीत जाणारा मुलगा असा परिवार आहे. हत्या झाली त्यावेळी दोघेही घरीच होते. पटेल यांच्या दुकानाबाहेर फुले आणि फुगे वाहून स्थानिकांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. कौटुंबिक आपत्तीमुळे दुकान काही दिवस बंद राहील. होणा-या गैरसोयीसाठी दिलगीर आहोत, अशा आशयाचा फलक त्यांच्या दुकाना बाहेर लावला आहे.

अमेरिकेत गेल्या आठवड्यात आमचा देश सोडुन जा, असे म्हणत एका इसमाने श्रीनिवास कुचीबोतला या ३२ वर्षीय भारतीय अभियंत्याची कन्सासमधील एका बारमध्ये हत्या केली होती. त्या वेळी बारमध्ये उपस्थित असलेल्या पैकी आलोक मदासनी या आणखी एका भारतीयावर बंदुक चालवण्यात आली. ज्यामध्ये ते जखमी झाले होते. या गुन्ह्यासाठी अ‍ॅडम प्युरींटन याला अटक करण्यात आली. भारतीयांवरील हल्ल्यानंतर त्याने दोन इराणी लोकांवरही बंदुक चालवल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *