तांत्रिक बिघाडांना सरावलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या आठवड्याचा पहिलाच दिवस तापदायक ठरण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा-चिंचपोकळी या स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या मार्गावरील डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या डाऊन दिशेच्या धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. परिणामी डाऊन दिशेच्या जलद मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. या सगळ्याचा फटका ठाणे आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे आता ही वाहतूक पूर्ववत होईपर्यंत डाऊन दिशेच्या प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वे मार्गावर रुळांना तडे जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रुळांना वारंवार तडे जाण्यामागे तापमानातील फरक आणि रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची संख्या कारणीभूत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने केला होता. तर पश्चिम रेल्वेनेही आपल्या हद्दीतील रुळांना तडे जाण्यासाठी किनारपट्टीला जबाबदार धरले होते. रेल्वे कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पश्चिम रेल्वेने तीन वर्षांत १३९ वेळा रुळांना तडे गेल्याच्या घटना घडल्याचे सांगितले. यात वातावरण बदलांबरोबरच रेल्वे रूळ किनारपट्टीजवळ असल्याचेही कारण देण्यात आले होते. सरत्या वर्षांच्या शेवटच्या आठवडय़ात कल्याणजवळ लोकल गाडीचे पाच डबे घसरून झालेला अपघात रुळांना तडा गेल्यानेच झाला होता. मध्य रेल्वेवर गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वे रुळांना तडा जाण्याच्या २६० घटना घडल्या आहेत. यासाठी रेल्वेकडून विविध कारणे दिली जात असून मध्य रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे रेल्वे रूळ ओलांडताना खडीवर दाब पडतो. त्यामुळे खडीची झीज होते. मध्य रेल्वेवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने रेल्वे रूळ जास्त तुटतात, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला होता.
