आपल्या स्वादिष्ट बर्गर आणि खुसखुशीत फ्रेंच फ्राइजसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मॅकडोनल्डमध्ये ग्राहकाला दिलेल्या जेवणात पाल सापडली. कोलकात्यामधील एका आउटलेटमध्ये पाल सापडल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकांकडून एकवेळच्या जेवणासाठी भरमसाठ पैसे घेणाऱ्या मॅकडोनल्डच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित आउटलेटवर कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रियांका मोईत्रा आणि तिचे कुटुंबीय इएम बायपास येथील मॅकडोनल्डमध्ये गेले होते. त्यांनी बर्गर आणि फ्रेंच फ्राइजची ऑर्डर दिली. आपले जेवण घेत असताना प्रियांकाच्या चार वर्षाच्या मुलीला फ्रेंच फ्राइजमध्ये पाल आढळली.
“माझ्या मुलीचा चौथा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही सर्व जण मनी स्क्वेअर येथील मॅकडोनल्डमध्ये गेलो. तिथे आम्ही बर्गर आणि फ्रेंच फ्राइजची ऑर्डर दिली. आम्ही खात असताना माझ्या मुलीला फ्रेंच फ्राइजमध्ये मेलेली पाल आढळली. हे दिसल्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागले”, असे प्रियांकाने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. “जेव्हा ही बाब आम्ही मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली त्याने आमची माफी मागितली.” प्रियांकाला अस्वस्थ वाटू लागले होते. तसेच आपल्या मुलीलाही असे काही होत असेल अशी शंका तिच्या मनात आली. त्यामुळे त्या पालीचा फोटो तिने काढला आणि तेथून तिने फुलबागन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. त्यानंतर ती रुग्णालयात गेली.
“तक्रार दाखल करणे अत्यावश्यक होते असे प्रियांकाने म्हटले. अशा अस्वच्छतेमुळे प्रसंगी कुणाचे प्राणही जाऊ शकतात”, असे तिने म्हटले आहे. आपण मॅकडोनल्ड विरोधात न्यायालयातही जाणार आहोत असे तिने म्हटले. ही बाब अतिशय गंभीर आहे. आपण आपल्या छोट्या मुलांना या ठिकाणी जेवणासाठी नेतो त्यांच्या प्रकृतीला अपाय झाल्यास कोण जबाबदार आहे असे तिने म्हटले. या घटनेची दखल मॅकडोनल्डच्या प्रशासनाने घेतली आहे. ही बाब गंभीर असून आम्ही जबाबदार व्यक्तीवर कारवाई करू असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेची आम्ही चौकशी सुरू केली आहे असे मॅकडोनल्डच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. आम्ही मोईत्रा कुटुंबियांच्या संपर्कात असून चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहोत असे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
