ब्रिटिशांनी रेल्वेसाठी झाडे तोडली नसतील का?

ब्रिटिशांनी रेल्वे उभारली, त्या काळात मुंबईमध्ये सर्वत्र झाडेच झाडे होती. ही झाडे तोडल्याशिवाय रेल्वे बांधणे शक्यच नव्हते. पण त्या वेळी झाडे तोडून रेल्वेचे जाळे उभारल्याचा फायदा आजही मुंबई महानगर प्रदेशातील लाखो लोक घेत आहेत. रेल्वे किंवा मेट्रोसारख्या प्रकल्पांच्या उभारणीत काही झाडे तोडली जाणे स्वाभाविक आहे. तरीही कमीत कमी झाडे तोडून तोडलेल्या झाडांच्या तिप्पट झाडे लावण्याचे ध्येय मुंबई मेट्रोरेल महामंडळाने ठेवल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाचा फायदा केवळ लोकांनाच नाही, तर पर्यावरणालाही मोठय़ा प्रमाणात होणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. मेट्रो-३च्या सुरुवातीच्या विस्तृत प्रकल्प अहवालात कमी झाडे तोडली जातील, असा दावा करण्यात आल्याचा आरोप काही जण करत आहेत. हा अहवाल त्या वेळच्या परिस्थितीवर आधारित होता. त्यात नंतर अनेक बदल करण्यात आले. प्रकल्पासाठी तुटणे आवश्यक असलेल्या झाडांचा आकडा २०१६च्या सुरुवातीला केलेल्या पाहणीप्रमाणे ४२५५ एवढा होता. प्रकल्पातील प्लॅटफॉर्मची लांबी कमी करून काही झाडे वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार तोडणे आवश्यक असलेल्या झाडांची संख्या ३८९१ एवढी आहे. त्यातही १०९० झाडे वाचवली जाणार आहेत. म्हणजेच अंतिम संख्या २८०१ असेल. त्यापकी १७२७ झाडांचे पुनरेपण केले जाणार असून १०७४ झाडे पूर्णपणे तोडली जाणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *