गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या नफ्यामध्ये घसरण होत असल्याचे लि-इको कंपनीचे मुख्यधिकारी जिया युटिंग यांनी सांगितल्यानंतर कंपनीने नुकतीच मोठी नोकर कपात केली आहे. लि-इकोच्या ८५ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीतील दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना थांबवण्याचे प्रयत्न झाले नसल्याचे कंपनीतील सूत्रांनी सांगितले आहे.
चिफ ऑपरेटिंग ऑफिसर (स्मार्ट इलेक्ट्रॉनिक) अतुल जैन आणि देवाशिष घोष (इंटरनेट अप्लिकेशन्स) यांनी राजीनामा दिला आहे. सुरुवातीच्या काळात ओप्पो, विव्हो आणि शिओमी सारख्या मोठ्या ब्रॅंडला मागे टाकणाऱ्या लि-इको कंपनीच्या नफ्यात लवकरच घसरण झाली. स्मार्टफोन निर्मितीमध्ये नफा येत आहे असे लक्षात येताच कंपनीने दुसऱ्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. या विस्तारामुळे कंपनीला तोटाही सहन करावा लागला.
नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी झाल्यानंतर त्याचा कंपनीलाही काही प्रमाणात फटका बसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. तसेच सध्या बंगळुरूतील संशोधन आणि विकास विभागातील कर्मचाऱ्यांना देखील काढून टाकण्यात येत आहे. कंपनी भारतातील गुंतवणूक कमी करणार असून अमेरिका आणि चीनमधील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे समजते.
सुरुवातीच्या काळात कंपनीने दरमहिन्याला जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. कंपनीच्या तोट्यात सातत्याने वाढ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने हा खर्च कमी केला. लि-इको कंपनीने अंदाजे ३७० कर्मचाऱ्यांना काढून टाकले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने काढून टाकण्यात येत आहे.
लि-इको कंपनीचा बाजारामध्ये नवे मॉडल्स आणण्याचा विचार आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ही बाब कठीण असल्याचे दिसत आहे. शिओमी कंपनीचे ऑनलाइन बाजारपेठ काबीज केली आहे तर व्हिवो आणि ओप्पोने ऑफ लाइन बाजारपेठेवर पकड मिळवली आहे. अशा परिस्थितीमध्ये लि-इकोला भारतामध्ये तग धरून राहणे काहीसे अवघड झाले आहे. त्यामुळेच कंपनीने नोकर कपात केली असून भविष्यामध्ये भारतातील प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
