बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला जीवे मारण्याची धमकी देणा-या अज्ञात व्यक्तीला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि आलियाचे वडिल महेश भट्ट यांना एका अज्ञात व्यक्तिने फोन करून आलियाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या व्यक्तिने त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणीदेखील केली. दरम्यान, मुंबई आणि उत्तर प्रदेश येथील पोलिसांनी मिळून सदर व्यक्तीस अटक केली असून त्याचा फोन ट्रेस करून या प्रकरणाचा खुलासा करण्यात आल्याचे म्हटले आहे.
सुरुवातीला भट्ट कुटुंबाने या धमकीला गांभीर्याने घेतले नाही. मात्र, काही वेळानंतर त्यांना एसएमएस आणि व्हॉट्स अॅप मेसेज पाठवण्यात आले. या धमकीला मस्करी समजण्याची चूक करू नका असे संदेशही त्यांना पाठविण्यात आले होते. तसेच, पैसे न दिल्यास मुलगी आलिया आणि पत्नी सोनी राजदान यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. यानंतर त्या अज्ञात व्यक्तिने आणखी काही मेसेजेस पाठवले. मुलगी आणि पत्नीच्या जीवाला धोका असल्यामुळे अखेर भट्ट यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी लगेच शोध घेतला आणि फोन ट्रेस करून धमकी देणा-या व्यक्तिला उत्तर प्रदेश येथून अटक केली.
याविषयी महेश यांचे भाऊ मुकेश भट्ट यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्हाला सेलिब्रिटी असल्याची कीमत चुकवावी लागते. महेश भट्टला उत्तर प्रदेशवरून ज्या नंबरवरुन फोन आला होता त्यास ट्रेस करून सदर व्यक्तिला पोलिसानी अटक केली आहे. त्याचसोबत मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी वेळेत कारवाई करण्यासाठी त्यांचे मुकेश यांनी आभार मानले.
