सध्या मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचे सुप्त परिणाम दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वैयक्तिक संबंधावरही होताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाच्यानिमित्ताने याचे प्रत्यंतर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडूनही काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी स्वत: मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे या लग्नाला जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आता या लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दानवे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यासाठी गेले होते तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांची बरीच राळ उडाल्याने भाजपने ‘तह’ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच दानवे यांनी शिवसेनेला डिवचणारी विधानेही केली होती. भाजप-शिवसेना युती ही २५ वर्षांपासून कायम होती. मात्र, सेनेचा काहीतरी गैरसमज झाला व त्यातून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे दानवेंनी म्हटले होते. युती शिवसेनेने तोडली असून आता पुन्हा युती करायची असल्यास शिवसेनेने हात पुढे करावा, असा टोलाही त्यांनी सेनेला लगावला होता.
रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांचा विवाहसोहळा आज औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. दोन्ही लग्नांचा मुहूर्त संध्याकाळचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे औरंगाबादला न जाता कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. दोन्ही लग्नांची वेळ एकच असल्याने रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला जाता येणार नसल्याचे कारण उद्धव यांच्याकडून पुढे करण्यात येत असले तरी या सगळ्याला कुठेतरी शिवसेना आणि भाजप यांच्यातीत सुप्त तणावही कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
