मध्य प्रदेशमधील झाबुआ येथे मंगळवारी सत्र न्यायालयाने दोन अल्पवयीन (अज्ञान) आरोपींना एका १४ वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ज्युवेनाइल जस्टिस (बाल न्याय, संरक्षण व काळजी) अॅक्ट, २०१५ अंतर्गत देण्यात आलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. न्यायालयाने जेव्हा हा निकाल घोषित केला, तेव्हा दोन्ही अल्पवयीन आरोपींना शिक्षा समजली नाही. त्यांनी वकील प्रतिभा सोनी यांना आम्हाला किती दिवसांची शिक्षा सुनावली आहे, असा सवाल विचारला. परंतु, सोनी यांनी त्यांना शिक्षेबाबत विस्तृतपणे सांगितले नाही. फक्त तुम्हाला मोठी शिक्षा झाली आहे, असे म्हणत सुधारगृहात चांगली वर्तणूक करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले.
गत वर्षी ६ डिसेंबर रोजी या दोघांनी नववीत शिकणाऱ्या राधू नाना पालियाची दिवसाढवळ्या हत्या केली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. झाबुआ शहरातील अयोध्या वस्तीत राहणारा पालिया शाळेतून आपल्या घरी परतत होता. त्यावेळी या दोन अल्पवयीन मुलांनी चाकू भोसकून त्याचा खून केला होता. ज्यावेळी हा प्रकार घडला. त्यावेळी त्यातील एका मुलाचे वय हे १६ तर दुसऱ्याचे १७ वर्षे इतके होते. हे दोन्ही आरोपी पालियाकडे पैसे मागत होते. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनी पालियाच्या मानेवर आणि पोटात चाकूने आठवेळा वार केल्याचे तपास अधिकारी आर. सी. भास्कर यांनी सांगितले.
हे दोन्ही अल्पवयीन आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सरकारी वकील एस.एच.खिंची यांनी सांगितले. शाळेतून त्यांना काढले होते. या दोन्ही आरोपींना ड्रग्ज घेण्याचीही सवय लागली होती. ड्रग्जसाठी त्यांना पैसे हवे होते. त्यासाठीच त्यांनी पालियाला लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्याने नकार देताच त्याचा खून केल्याचे त्यांनी म्हटले.
भास्कर म्हणाले, पालियाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. आम्ही दुसऱ्या दिवशीच दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून रक्ताने माखलेले कपडे आणि दोन चाकू जप्त केले होते. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. आरोपींना आपल्या हवाली करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. आरोपींच्या कुटुंबीयांनी देखील त्यांना वेगळे केले होते. कोणताही वकील त्यांचा खटला चालवण्यास घेत नव्हता. त्यामुळे या आरोपींना सरकारनेच एक वकील दिला होता. न्यायाधीश ए.ए.खान यांनी ज्युवेनाइल जस्टिसच्या आयपीसी कलम ३०२, १५ आणि १६ अतंर्गत दोन्ही अल्पवयीन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एखाद्या अल्पवयीन मुलांना वयस्कर आरोपींप्रमाणे शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे.
