मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने आज पुन्हा एकदा रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. गेल्या तीन तासापासून विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे कामावर जाणा-या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेला आठवडाभर मध्य रेल्वेवर पावसाचे पाणी तुंबणे, इंजिन बंद पडणे, रुळ खचणे अशा अनेक कारणांनी रेल्वेचा खोळंबा होत असताना आज ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकल या धीम्या मार्गावरून सोडण्यात येत आहेत. कामावर निघालेल्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. मात्र चौथा शनिवारची अनेक कार्यलयांना सुटी असल्याने प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याने गर्दीचे प्रमाण कमी आहे.
मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत. दरम्यान, रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

