भारताचा बास्केटबॉलपटू सतनाम सिंहने इतिहास रचला आहे. अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात एनबीए लीगमध्ये समावेश झालेला सतनाम पहिलाच भारतीय बास्केटबॉलपटू ठरला आहे.
व्यावसायिक बास्केटबॉलमधली सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची स्पर्धा असा एनबीएचा लौकिक आहे. सतनाम या स्पर्धेत डलास मॅवरिक्स संघाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसेल. 19 वर्ष वयाचा आणि 7 फूट 2 इंच उंचीचा सतनाम एनबीएमधील सर्वात उंच खेळाडूंपैकी एक आहे.
पंजाबच्या लुधियानामधील एका गावात जन्मलेल्या सतनामने 2011 आणि 2013 साली फिबा एशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्वही केलं होतं. गेले काही महिने सतनाम अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आयएमजी रिलायन्स अॅकॅडमीत सराव करत होता. तिथूनच एनबीएचं दार त्याच्यासाठी खुलं झालं.
यंदा एप्रिल महिन्यात एनबीएच्या सॅक्रॅमेण्टो किंग्स संघाने भारतीय वंशाच्या सिम भुल्लरला करारबद्ध केलं होतं. पण सिम हा जन्माने कॅनेडियन आहे. त्यामुळे सतनाम हा एनबीएमध्ये समावेश झालेला पहिलाच भारतीय नागरिक ठरला आहे.

