1300 ची पावती फाड, नायतर 300 तरी दे, ट्रॅफिक पोलिसाची चिरीमिरी कॅमेऱ्यात कैद

1300 ची पावती फाड, नायतर 300 तरी दे, ट्रॅफिक पोलिसाची चिरीमिरी कॅमेऱ्यात कैद

पोलीस, पैसे आणि सेटलमेंट हे सूत्र सर्वत्र पाहायला, अनुभवायला मिळतं. साधा ट्रॅफिक पोलीस असो, वा पोलिस स्टेशनमध्ये बसणारा बडा अधिकारी, या सर्वांसाठी हे सूत्र अनेकवेळा लागू झाल्याचं सिद्ध झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीजवळ अशीच घटना घडली आहे.

शेतकऱ्याकडून चिरीमिरी घेणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाची  चिंधीगिरी उघड झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या ट्रॅफिक पोलिसाची ही चिंधीगिरी कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईट्सवर फिरत आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीच्या एका शेतक-याने हा व्हिडिओ एबीपी माझाला पाठवला आहे.

या व्हिडीओनुसार, शेतकऱ्यांचा माल घेऊन जाणाऱ्या गाडीला ट्रॅफिक पोलिसाने अडवलं. मग विविध कारणं देत, या पोलिसाने चालकाकडे 1300 रुपयांची मागणी केली. एकाचवेळी 1300 रुपयांची मागणी गेल्यामुळे, या चालकाची भावमुद्राच बदलली. मात्र या चिंधीगिरीकरणाऱ्या पोलिसांने त्या चालकाकडे दुसरा पर्याय ठेवला. तो म्हणजे एक तर 1300 रुपये दे आणि पावती घे किंवा 300 रुपये दे पण पावती मिळणार नाही.

यानंतर दोघांमध्ये तडजोड सुरू झाली. अखेर 1300 रुपयांचा व्यवहार 100 रुपयांवर सेटल झाला.

अशा घटना फक्त सोलापूर किंवा बार्शीतच घडतात असं नाही. हे फक्त समोर आलेलं उदाहरण आहे. मात्र अनेक छोट्या-छोट्या शहरांत, महामार्गांवर असे प्रकार रोजचेच असतात.

आता या बातमीनंतर या व्हिडओत दिसलेले कर्मचारी निलंबित होतीलही. पण मुद्दा यांच्या निलंबना एवढा छोटा नाही. राज्य सरकारने याची दखल घेऊन, असे प्रकार पूर्ण बंद करण्याचे उपाय शोधायला हवे. तसंच जर पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली, तर अनेक गैरप्रकार आपोआप कमी होतील. मात्र नियम हे सर्वांना समानच लावायला हवे. मग तो शेतकरी असो, वा कोणी गर्भश्रीमंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *