मतदान यंत्राचे सर्किट आणि मेमरी तपासा

मतदान यंत्राचे सर्किट आणि मेमरी तपासा

नोटाबंदीनंतर राज्यात भाजपा विरोधात लोकांच्या मनात प्रचंड राग असताना ज्या त-हेने भाजपाला यश मिळाले आहे, त्यावरून मतदान यंत्रणेत काहीतरी घोटाळा झाला आहे, हे स्पष्ट आहे. अनेक लोक काँग्रेसला मतदान केल्याचे सांगत असताना काँग्रेसचा पराभव कसा झाला? यामागे मतदान यंत्रातील घोळ आहे, असा आरोप नागपूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार प्रकाश धावड यांच्या पत्नी प्रणोती यांनी केला आहे. हा घोळ उघडकीस आणण्यासाठी मतदान यंत्राचे सर्किट आणि मेमरी तपासा, अशी मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीत प्रकाश धावड हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या प्रभागात त्यांचे चांगले कार्य आहे, प्रचारादरम्यान त्यांना लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र तरीही त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाचा धक्का त्यांच्या प्रभागातील मतदारांनाही बसला. शेकडो मतदारांनी आम्ही तुम्हालाच मतदान केलेले असताना पराभव कसा झाला, असे सांगत आहेत, असे प्रणोती यांनी म्हटले आहे.

नागपूरप्रमाणेच इतर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही धक्कादायक निकाल लागले आहेत. १० पैकी ८ महापालिकेवर भाजपाची सत्ता आली आहे. तर अनेक जिल्हा परिषदेतही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकंदर नोटाबंदीनंतर लोकांचा भाजपाच्या विरोधात जोरदार रोष आहे, असे असताना सर्वत्र मिळालेले यश संशयास्पद असल्याचा आरोप संपूर्ण राज्यातून होत आहे.

मात्र तक्रार करायला कुणी पुढे येत नव्हते. अखेर आता प्रकाश धावड यांच्या पत्नी प्रणोती यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही, तर मतदान यंत्रातील घोळ, मतदार याद्यांतील घोळ याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे प्रणोती यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *