उद्यापासून राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरूवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या फेब्रुवारी-मार्चमधील बारावीच्या लेखी परीक्षेची सुरूवात मंगळवारी, २८ फेब्रुवारीपासून होत आहे. राज्यातील ९ हजार १४३ कनिष्ठ महाविद्यालयातील १५ लाख ०५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला नोंदणी केली असून यात ८ लाख ४८ हजार ९२९ विद्यार्थी आणि ६ लाख ५६ हजार ४३६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. ही परीक्षा एकुण २ हजार ७१० परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

बारावीच्या परीक्षेला मुंबईतील १ हजार १८९ महाविद्यालयातील ३ लाख ३९ हजार ६७२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा ५५७ मुख्य परीक्षा केंद्र आणि ७० हून अधिक उपकेंद्रातून घेतली जाणार असून यासाठी ६८ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोकण विभागातून यंदा बारावीच्या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या १ हजाराने कमी झाली असून यात २४३ कनिष्ठ महाविद्यालयातील एकुण ३२ हजार ७४३ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा यंदा ५९ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार असून त्यासाठी २२ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

मागील वर्षाप्रमाणे बारावीची ही लेखी परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार असून इंग्रजी विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत लागू आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे नियोजन करता यावे यासाठी प्रत्येक पेपरच्या दरम्यान अवकाश (गॅप) ठेवण्यात आला आहे तर विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विभागीय मंडळात प्रत्येक एक जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंडळाकडून पहिल्यालांदाच घेण्यात येणा-या सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून १ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ही परीक्षा राज्यात ४० परीक्षा केंद्रावर घेतली जाईल. त्याच प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून यासाठी १ लाख ११ हजार ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा राज्यात १,३४६ परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल अशी माहितीही पाटील यांनी दिली.

आऊट ऑफ टर्नचा पर्याय

बारावीच्या परीक्षेदम्यान कोणत्याही विद्यार्थ्यांला ऐनवेळी काही वैद्यकीय अथवा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत या प्रात्यक्षिक परीक्षेला बसता आले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्याचा मंडळाने नवीन पर्याय यावेळी दिला आहे. यासाठी विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना आऊट ऑफ टर्न ने या परीक्षेला पुन्हा बसता येणार असून ही परीक्षा २७ ते २९ मार्च या कालावधीत जिल्हानिहाय केंद्रावर घेतली जाणार आहे.

कॅलक्युलेटरची सोय

दहावीप्रमाणेच बारावीतील स्वमग्न विद्यार्थ्यांना गणित विषय सर्व शाखा आणि पुस्तपालन व लेखाकर्म या विषयासह विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसाठी कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र हा कॅलक्युलेटर विद्यार्थ्यांनी स्वत: आणणे आवश्यक आहे. मात्र यात मोबाईलचा वापर करता येणार नाही. तसेच परीक्षा काळात गैरमार्गाना आळा बसवण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात सात प्रमाणे राज्यभरात एकुण २५० भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच गणित, इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या दिवशी बैठे पथक असणार आहेत.

दहा मिनिटापूर्वीच प्रश्नपत्रिका

राज्य शिक्षण मंडळाने मागीलवर्षाप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर हातात प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रश्नपत्रिका वाचण्यासाठीचा वेळ वाया जाणार नसून याचा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *