लग्नमंडपातून अनेकवेळा नववधू किंवा वर पळून गेल्याच्या घटना ऐकल्या असाल. पण मुंबईतील एका लग्नातून पळालेल्या ‘पायल’ची गोष्टच न्यारी आहे. पायलने लग्न मुहूर्ताच्या काही क्षणापूर्वीच धूम ठोकली. लग्नासाठी सजलेली पायल रस्त्यावरून धावत सुसाट सुटली. ‘पायल’ला पकडण्यासाठी तिची समजूत काढण्यासाठी अनेकांनी तिचा पाठलाग केला. पण ‘पायल’ने थेट वांद्रे-वरळी सी लिंक गाठलं.
पायल..ही दुसरी-तिसरी कोणी नसून, ती आपल्या पाठीवर बसवून नवरदेवाला मिरवणारी 4 वर्षांची घोडी आहे. 23 एप्रिल रोजी एका लग्नमंडपातून पायल पळाली होती.
धावत धावत वांद्रे वरळी सी लिंकवर ही घोडी आल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांही ध्यानात आलं नाही. एकही वाहन टोलशिवाय न सोडणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना, पायलने कधी टोलबूथ पार केला कळलंच नाही. सी लिंकवर गेल्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या टोल कर्मचाऱ्यांना पायलचं दर्शन झालं. मग त्यांनी मुंबई पोलिस कंट्रोल रुमला कळवलं.
पायलने पोलिसांनाही चांगलंच तंगवलं. एका पायाने फ्रॅक्चर असलेली पायल मुंबईच्या ट्रॅफिकमध्येही बिनधास्त वावरत होती. या पायलला कैद केलंय टोल नाक्यावरच्या सीसीटीव्ही कँमेऱ्यानं.

