चिक्की घोटाळा प्रकरणात गोत्यात आलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांना आणखी एक झटका बसला आहे. शेतात घातक रसायन सोडल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या औरंगाबादच्या रॅडिको डिस्टलरीज कंपनीला, उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही कारवाई केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे मद्यार्क निर्मिती करणाऱ्या या कंपनीत पंकजा मुंडे आणि त्यांच्या पतीची भागीदारी आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबादमधील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील रॅडीको कंपनीने, शेतकऱ्यांच्या 6 एकर जमिनीमध्येही मोठ्या प्रमाणात घातक रसायने सोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. या विषारी केमिकलमुळे, परिसरातील शेती अडचणीत सापडली आहे.
शेंद्रा गावाच्या शेतातील असा एकही भाग नाही ज्यात केमिकल नाही. केमिकलमुळे या भागातील शेती नापीक झाली आहे. या शेतीत पेरलेला एकही दान उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. या शेतांमध्ये केमिकल रॅडिको डिस्टिलरीज कंपनीने सोडल्याचा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला होता.
केमिकल नुसतं शेतांमध्ये सोडलेलं नाही तर गावातील काही विहिरींमध्ये केमिकल सोडण्यात आलं आहे. या विषारी रसायनामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या केमिकलयुक्त पाण्याचा परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी जमीन लाल पडल्याने जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे.
