मुंबईत सातही धरणांमधील पाणीसाठा ७ टक्क्यांवर, वैतरणा-तानसा जवळजवळ रिकामे; जुलैमधील पावसामुळे दिलासा मिळणार?

मुंबईत २३ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर ४८ तास शहराला पावसाने झोडपलं पण त्यानंतर पुन्हा काही दिवस मुंबईत पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आणि २८ जूनपासून पुनरागमन झालं. पण संपूर्ण जून महिना शहरात पुरेसा पाऊसचं झाला नाही. देशात हा १४६ वर्षांमधील सर्वात कोरडा जून महिना होता. त्यामुळे मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा चक्क ७ टक्क्यांवर आला आहे. मुंबई महापालिकेने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.

किती पाणी शिल्लक?

शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार सातही धरणांमध्ये एकूण १ लाख २७९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणांमध्ये १४.४७ दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. अप्पर वैतरणा,मध्य वैतरणा, भातसा, तानसा, मोडक सागर, तुळशी आणि विहार हे सर्व धरण पाण्यासाठी मोसमी पावसावर अवलंबून असतात.

अप्पर वैतरणामध्ये वापरण्यायोग्य पाणी उरलचं नाही हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार शून्य टक्के वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे. मोडक सागरमध्ये क्षमतेपेक्षा १८.४७ टक्के पाणीसाठा होता, तानसा धरणही जवळजवळ रिकामा झालं आहे. मध्य वैतरणामध्ये क्षमतेपेक्षा ११.५३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. भातसामधील एकूण साठा ६ टक्क्यांहूनही खाली आहे. विहार धरणात पाणीसाठ्यात काहीशी वाढ दिसून आली असून पाणीसाठी ४५.१३ टक्क्यावर आहे. तुळशी धरणातही वाढ नोंदली गेली असून पाणीसाठा २४.२६ टक्क्यांवर होता. गेल्या २४ तासांपासून सुरू झालेल्या पावसामुळे विहार आणि तुळशीमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पण इतर धरणांतील पाण्याची पातळी घसरल्यामुळे पाणीसाठी ७.०८ टक्क्यांवरून थेट ६.९३ टक्क्यांवर पोहोचला.

पावसामुळे फायदा होणार का?

येत्या काही दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २ जुलैपर्यंत शहरात यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसणार आहे. २९ जून रोजी राज्यात सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला असून त्यामुळे पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. जुलैच्या पावसाकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. २०२६ च्या तुलनेत २०२४ मध्ये पाणीसाठा आणखी कमी झाला होता. जूनच्या अखेरीस २०२४ मध्ये पाणीसाठा ५.४३ टक्क्यांवर पोहोचला होता. धरणांमध्ये ७८,५७९ दशलक्ष लीटर पाणी होतं. पण २०२५ च्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *