केवळ रक्तच नव्हे, प्लाझ्मा विक्रीतूनही कमाई; कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता

 जे. जे. महानगर रक्तपेढीमधून केवळ रक्ताच्या पिशव्यांची उचलेगिरी झालेली नाही, तर इथून परराज्यांतील फ्रॅक्शनेटर कंपन्यांकडे प्लाझ्मा ही पाठवण्यात आला आहे. निकषांना डावलून झालेल्या या प्लाझ्मा विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे.

जे. जे. महानगर रक्तपेढीने राज्य रक्त संक्रमण परिषदेला दिलेल्या माहितीनुसार, २०२३मध्ये ११३०७ युनिट (सुमारे २,२६१.४ लिटर), २०२४मध्ये १७७२८ युनिट (सुमारे ३,५४५.६ लिटर), २०२५मध्ये १६८२२ युनिट (सुमारे ३,३६४.४ लिटर) आणि २०२६मध्ये (मे २०२६पर्यंत) ७५३८ युनिट (सुमारे १,५०७.६ लिटर) प्लाझ्मा राज्याबाहेरील ‘फ्रॅक्शनेटर’कडे (प्रक्रिया करणाऱ्या केंद्राकडे) पाठवण्यात आला. याचा अर्थ एकूण ५३ हजार ३९५ युनिट प्लाझ्मासाठी (सुमारे १०,६७९ लिटर) प्रति युनिट एक हजार रुपये (किंवा प्रति लिटर ५,००० रुपये) अतिरिक्त पैसे दिल्याची शक्यता लक्षात घेतली, तर याद्वारे जे. जे. महानगर रक्तपेढीचे संचालक डॉ. हितेश पगारे यांनी ५ कोटी ३३ लाख ९५ हजार रुपये आर्थिक नफा मिळवल्याची शक्यता आहे. निर्धारित दरापेक्षा अधिक दराने हा प्लाझ्मा विकला गेल्याची खात्रीलायक माहिती जे. जे. महानगर रक्तपेढीतील सूत्रांनी दिली.

हा प्रकार अतिशय गंभीर असून अन्न व औषध प्रशासन (एफडीआय) तसेच राज्याच्या आरोग्य विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने करण्याची मागणी होत आहे.

राज्यात सध्या प्लाझ्माची मागणी आणि त्यातील काळाबाजार वाढता आहे. जे. जे. महानगर रक्तपेढीप्रमाणे राज्यातील काही रक्तपेढ्यांच्या माध्यमातून खासगी कंपन्या या प्लाझ्मा विक्रीद्वारे लूटमार करत असल्याचे आरोग्य विभागच्याही निदर्शनास आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या माहितीनुसार, एक लिटर प्लाझ्मा प्रक्रियेसाठी पाठवल्यास त्या मोबदल्यात सोळाशे रुपयांची वस्तू, वैद्यकीय सामग्री हा प्लाझ्मा विकत घेणाऱ्या कंपन्यांकडून दिली जाते. खासगी रक्तपेढ्यांना फ्रॅक्शनेटर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात भेटवस्तू किंवा देणग्या मिळतात, मात्र त्याची नोंद होत नाही.

मागील दोन वर्षांत रक्त तसेच रक्तघटकांची गरज वाढली असून, तो विकत घेण्यासाठी या क्षेत्रातील खासगी कंपन्यांची कितीही पैसे मोजण्याची तयारी आहे. या कंपन्यांचा डोळा सार्वजनिक क्षेत्रातील रक्तपेढ्यांकडून मिळणाऱ्या प्लाझ्मावर असतो. या कंपन्यांना सध्या सहा ते सात हजार रुपये प्रतिलिटर दराने प्लाझ्मा विकला जातो. या कंपन्या रोखीने पैसे देत नाहीत. हे व्यवहार बँक ट्रान्सफर तसेच आरटीजीएस पद्धतीने केले जातात. अधिकृत करार सोळाशे रुपयांचा असला तरीही जे. जे. महानगर रक्तपेढीसारख्या किंवा ट्रस्टच्या रक्तपेढीच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करून पावती मात्र सोळाशे रुपयांची दिली जाते. रक्तपेढी तसेच एसबीटीसीच्या अधिकृत खात्याशिवाय डॉ. हितेश पगारे, सामाजिक वैद्यकीय अधिकारी अजय भिसे आणि या दोघांचे निकटवर्तीय सतीश वाघमारे यांच्या वैयक्तिक खात्यामध्येही असे किती पैसे आले आहेत याचा तपास करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात डॉ. हितेश पगारे , अजय भिसे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

… म्हणून प्लेटलेट्‌सचा तुटवडा
प्लेटलेट्स तयार करण्यासाठी काही प्रमाणात प्लाझ्मा वापरला जातो. त्यामुळे प्लाझ्माचे प्रमाण कमी होते. राज्यातील अनेक रक्तपेढ्या प्लेटलेट्स तयार करायला उत्सुक नाहीत. अनेकदा रक्ताप्रमाणे प्लेटलेट्सचाही तुटवडा निर्माण होतो. यकृत, मूत्रपिंडाचे विकार तसेच भाजलेल्या रुग्णांसाठी गोठवलेला प्लाझ्माही रुग्णांना नाकारला जातो.

नियम पायदळी
रक्ताच्या ३५० मिलीच्या एका युनिट रक्तपिशवीमधून सुमारे दोनशे मिली प्लाझ्मा मिळतो. म्हणजेच पाच युनिट मिळून एक लिटर प्लाझ्मा तयार होतो. तसेच, ४५० मिलीच्या रक्तपिशवी युनिटमधून २५० मिली प्लाझ्मा संकलित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अधिक नफ्यासाठी जे. जे. महानगर रक्तपेढीने अधिकाधिक ४५० युनिट रक्तपिशव्यांचा वापर केल्याचे कळते.

याचे स्पष्टीकरण द्या
राज्यातील प्लाझ्मा फ्रॅक्शनेटरला कोणत्या दराने देण्यात येतो याबद्दल तपासणी करणे तसेच राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनेप्रमाणे फ्रॅक्शनेटरशी केलेला करारनामा राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत मान्य करून घेतला आहे की, नाही याची पडताळणी करणे बंधनकारक आहे. रक्त संकलन गरजेपेक्षा अधिक होत असले तर त्या रक्तकेंद्रातून इतर राज्यांत अधिक संख्येने रक्तघटक जात असतील, तर ते कोणत्या दराने वितरित करण्यात येतात, याची माहिती द्यावी, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिल्या आहेत.

अशी होते अतिरिक्त कमाई
प्लाझ्माचा काळाबाजार करताना तीन पद्धतींचा वापर केला जातो. एक म्हणजे रक्तपेढीचे प्रमुख, मुख्य तंत्रज्ञ, तांत्रिक पर्यवेक्षक किंवा समाजसेवक यांच्या नावे खाते उघडून त्यात अतिरिक्त पैसे जमा केले जातात. दुसरी पद्धत म्हणजे, अतिरिक्त पैसे ट्रस्टच्या खात्यात देणगी म्हणून जमा होतात किंवा वस्तू अथवा वैद्यकीय सामग्री दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *