“एकदा तरी कोकणचा पाऊस अनुभवावा…” असं म्हणतात. पण का? कारण पावसाळ्यात कोकण फक्त बदलत नाही, तर त्याचा पुनर्जन्म होतो.
हिरवाईचा नऊवारी शालू..
खळाळणारे धबधबे आणि नद्या..
कोकणातल्या प्रत्येक डोंगरावरून सध्याही पाऊस जसजसा तग धरत आहे तसतसं दर दिवशी एक नवा धबधबा जन्माला येतोय. महामार्गावरून जाताना डाव्या-उजव्या हाताला कोसळणारे पांढरे शुभ्र पाण्याचे प्रवाह मनाला एक वेगळीच शांतता देताहेत. आंबोली घाट, सवतसडा किंवा मार्लेश्वरचे धबधबे पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतंय.
चुलीवरचं जेवण आणि सुक्या मासळीचा सुवास..
कोकणच्या खाद्यसंस्कृतीतसुद्धा पावसाळ्यात बदल पाहायला मिळतात. पावसाळ्यात समुद्रात प्रत्यक्ष मासेमारी बंद असली तरीही कोकणी घरातली चव मात्र दुप्पट यावेळीसुद्धा मासळीशिवाय पूर्णच होत नाही. गोडाच्या पदार्थांची जोडही त्यात असतेच. ज्यामध्ये हळदीच्या पानातले पातोळे (एक गोड पदार्थ), वाफाळते उकडीचे मोदक, सुक्या बांगड्याचं किंवा कोळंबीचं तिखलं, चुलीवरची तांदळाची भाकरी आणि बाहेर कोसळणारा पाऊस, घरात चुलीपाशी बसून घेतलेला हा आस्वाद म्हणजे केवळ सुख!
खवळलेला समुद्र…
एरव्ही शांत आणि मन मोहणारा कोकणातील समुद्र पावसाळ्यात अक्षरश: गर्जना करत असतो. गुहागर, गणपतीपुळे किंवा तारकर्लीच्या किनाऱ्यावर उभं राहून समुद्राच्या उसळणाऱ्या खळाळत्या लाटा आणि धुक्यात हरवलेले जंजिरा, सिंधुदुर्गासारखे गडकोट पाहणं हा एक थरारक अनुभव ठरतो.
कोकणची पावसाळी सफर करताना काय लक्षात ठेवाल?
कोकणात पावसाळ्यात येताना कापडी छत्र्यांपेक्षा रेनकोट सोबतीला ठेवा. कारण, कोकणचा पाऊस वाऱ्यासोबत येतो, त्यामुळे छत्री टिकत नाही!
पावसाळ्यातल्या कोकणाची ही जादू शब्दात मांडणं कठीण आहे, ज्यामुळं ती प्रत्यक्ष तिथंच जाऊनच अनुभवावी लागते. मातीचा तो सुगंध, पानांवरून घरंगळणारे पाण्याचे थेंब आणि मन प्रसन्न करणारी शांतता हे सारंकाही तुम्हालासुद्धा पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पाडेल. मग, यंदाच्या पावसाळ्यात मग कधी निघताय कोकणात?
