पहिल्याच पावसात आंबोली घाटातील एक भलामोठा दगड थेट रस्त्यावर येऊन कोसळल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी तीन वाजता एक भला मोठा अजस्त्र दगड थेट रस्त्यावर कोसळून पर्यटकांच्या गाडीवर येऊन आदळला. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने मनुष्यहानी टळली. तसेच गाडीतील पर्यटक धबधब्यांकडे गेले असल्याने ते बालंबाल बचावले.
कड्यावरून कोसळलेला हा दगड स्टॉलसमोर उभ्या करून ठेवलेल्या गाडीवर रोलरसारखा आदळला.
पुणे येथून सुशांत यादव (कोंडवा-पुणे) हे आपल्या कुटुंबासमवेत गोव्याला गेले होते. गोव्याहून परतताना आंबोली येथे धबधब्यानजीकच्या स्टॉलजवळ गाडी उभी करुन ते सर्वजण धबधब्याखाली गेले असतानाच ही घटना घडली.
सुदैवाने गाडीत यावेळी कोणी नव्हते व रस्त्यावरही पर्यटक वा इतर गाड्या नसल्याने मोठी हानी टळली. यामुळे बराचवेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

