पिंपरीत बुधवारी सकाळी प्रवाशांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काही स्थानिक लोक खासगी वाहन घेऊन नातेवाईकांना एसटी स्टँडवर सोडायला आले होते. यावेळी त्यांनी वाहन नो पार्किंग क्षेत्रात लावले होते. या कारणावरून वल्लभनगर-विटा या एसटी चालकाचा आणि त्यांचात वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी सगळ्यांनी मिळून एसटी चालकाला मारले. त्यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळपासून बंद पुकारला आहे. वरिष्ठांनी दखल घेईपर्यंत आणि पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये एसटी चालकाला मारहाण करण्यात आल्याची ही पाचवी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडी येथे अशाचप्रकारच्या वादात रिक्षाचालकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मुंबई सेंट्रल, ठाणे, परळ आणि पनवेल एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनीही बंद पुकारला होता. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमावर हाल झाले होते.