उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. या टप्प्यात राज्याच्या पश्चिम भागातील ६७ मतदारसंघांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडेल. सहारनपूर, बिजनौर, मोरादाबाद, संबल, रामपूर, बरेली, अमरोह, पिलिभीत, खेरी, शहाजानपूर आणि बदाऊन या ११ जिल्ह्यांमध्ये हे ६७ मतदारसंघ विभागले गेले आहेत. या ६७ मतदारसंघांसाठी एकूण ७२० उमेदवार रिंगणात आहेत. या भागातील मतदानाची टक्केवारी अखिलेशप्रणित समाजवादी पक्षासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील निवडणुकीत या ६७ मतदारसंघांपैकी ३४ जागांवर समाजवादी पक्षाने विजय मिळवला होता. तर बसप, भाजप , काँग्रेस आणि अन्य पक्षांना अनुक्रमे १८,१०, ३ आणि २ जागा मिळाल्या होत्या. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर या मतदारसंघांमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अशा सर्व बड्या नेत्यांनी याठिकाणी सभा घेतल्या आहेत. गेल्या अडीच वर्षातील केंद्र सरकारचा कारभार , नोटाबंदी , जातीय हिंसाचार, भाजप नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्ये या पार्श्वभूमीवर याठिकाणचे मतदार काय कौल देणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. या भागातील मतदानाचा पॅटर्न उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतो. तत्पूर्वी ११ फेब्रुवारीला पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील उर्वरित मतदानाचे टप्पे अनुक्रमे १९, २३ आणि २७ फेब्रुवारी आणि त्यानंतर ४ व ८ मार्चला पार पडतील. त्यानंतर ११ मार्चला इतर चार राज्यांसह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.