रसिलाच्या स्वप्नांचा करुण अंत

पुणे – सॉफ्टवेअर इंजिनिअर रसिला राजू ओपी ही केरळमध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 98 टक्‍के मार्क मिळवून “टॉपर’ बनली होती. इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केल्यानंतर केरळ येथेच इन्फोसिस कंपनीत तिची निवड झाली होती.

अलीकडेच तिला लग्नाबाबत प्रस्ताव आल्याने वडिलांनी तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली होती; पण एका माथेफिरू सुरक्षारक्षकाने तिच्या स्वप्नांचा चुराडा केला.
हिंजवडी येथील इन्फोसिस आयटी कंपनीत काम करणाऱ्या रसिलाचा रविवारी सुरक्षारक्षकाने केबलने गळा आवळून खून केला. तिच्या आठवणी सांगताना मैत्रिणींना दु:खावेग आवरत नव्हता. रसिला ही मूळची कालिकत येथील कुंदमंगलम या गावची. वडील होमगार्डच्या सेवेत; तर आई गृहिणी. आर्थिक स्थिती बेताचीच. ती शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होती. ती शाळेत आणि महाविद्यालयात ती सतत “टॉपर’ असायची. सुमारे तीन वर्षांपूर्वी आई पुष्पलता यांचे काविळीच्या आजाराने निधन झाले. हलाखीची परिस्थिती असतानाही वडिलांनी रसिला आणि तिचा मोठा भाऊ लेजनकुमार यांना शिक्षण दिले. लेजनकुमार अबुधाबी येथे एअरलाइन्स कंपनीत कामास आहे. त्याचा मोठा आधार गरीब कुटुंबाला मिळाला होता. मुलगीही चांगल्या कंपनीत रुजू झाल्याने ते चांगल्या भविष्याची स्वप्ने रंगवत होते.

रसिलाच्या खुनाच्या घटनेमध्ये सुरक्षारक्षकच नव्हे; तर आणखी एक जण सहभागी असल्याची शक्‍यता आहे. तो कंपनीतलाच असावा, असा आरोप करून “एकटीला कामावर बोलावल्यानंतर सुरक्षेची खबरदारी कंपनीने घेणे अपेक्षित होते’, असे रसिलाचे वडील राजू ओपी म्हणाले. मुलीला कंपनीतील एक अधिकारी सतत त्रास देत होता, असा आरोपही त्यांनी केला. कंपनीत तिच्या विभागात सुरक्षारक्षकाने संगणक डिटेल्स घेण्याच्या बहाण्याने प्रवेश मिळविला, असे सांगण्यात येत आहे. मात्र, सुरक्षारक्षकाला कोणते डिटेल्स घ्यायचे होते, कार्यालयातील कामाशी सुरक्षारक्षकाचा काय संबंध येतो, असा सवाल तिची मैत्रिण शायनी नौशाद यांनी उपस्थित केला आहे.

रसिलाने सुरक्षारक्षकाविरुद्ध कंपनीकडे तक्रार केली होती. शिवाय, कंपनीतील एका अधिकाऱ्याकडून तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने बदलीची मागणीही केली होती, असे त्यांनी सांगितले. रसिलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी मुंबई येथून कालिकत (केरळ) येथे नेण्यात येईल. त्यानंतर तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे; या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे इन्फोसिस कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *