परराष्ट्र मंत्र्यांचा मदतीचा हात, चिमुकल्याच्या सर्जरीसाठी एअरलिफ्ट

हदयसंबंधित आजाराविरोधात झुंज देणा-या केवळ दोन दिवसांच्या तान्ह्या बाळावर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तातडीने मदत उपलब्ध करुन दिली. नवजात मुलाच्या वडिलांनी ट्विटरद्वारे पीएमओ आणि आरोग्य मंत्रालयाकडे मदतीची मागणी केली होती. मात्र यावेळी सुषमा स्वराज यांनी ट्विट पाहताच क्षणाचाही विलंब न लावता तातडीने त्या मुलाला उपचारांसाठी भोपाळहून विमानाच्या सहाय्याने दिल्लीपर्यंत आणले.
नवजात मुलाचे वडील देव यांनी ट्विटवर मुलाचा फोटो पोस्ट करत ट्विट केले होते की, ‘मुलाची तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, मात्र शस्त्रक्रियेसाठी भोपाळमध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नाही. कृपया मदत करावी’.
देव यांचे ट्विट पाहून सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत मुलाच्या कुटुंबीयांसोबत संपर्क करण्यासाठी त्यांचा फोन क्रमांक मिळवला.
मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क झाल्यानंतर सुषमा यांनी आणखी एक ट्विट करत सांगितले की, ‘आमचा मुलाच्या परिवाराशी संपर्क झाला असून भोपाळमधील कार्यालयाद्वारे त्याचे मेडिकल रिपोर्ट्स मिळाले आहेत. एम्समधील कार्डिअॅक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर बलराम ऐरन यांनी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही मुलाची दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था करु शकतो. आता निर्णय कुटुंबीयांना घ्यायचा आहे.’
सुषमा स्वराज हॉस्पिटलमधून परतल्यानंतर लोकांना भेटू शकत नाहीत, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या गरजूंची मदत करत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर तक्रारी तसेच मदतीची मागणी करणारे ट्विट्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याद्वारे सुषमा स्वराज आपल्यापरीने सर्वसामान्यांची मदतही करतात. भोपाळमधील नवजात मुलाच्या शस्त्रक्रियासाठी उपलब्ध करुन दिलेली मदत यापैकीच एक उदाहरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *