नरेंद्र मोदींच्या नावाने वेबसाईट सुरु करुन फसवणूक करणा-या दोघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवले असून मोदींसाठी ही मोहीम प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. मात्र मोदींच्या याच मोहीमेचा आधार घेऊन काही भामट्यांची ‘दुकानदारी’ही सुरु केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गैरवापर करत वेबसाईट सुरु केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. नरेंद्र मोदी कॉम्प्यूटर साक्षरता मिशन (www.nmcsm.in) या नावाने वेबसाईट सुरु केल्याचे पंतप्रधान कार्यालयाने २०१६ मध्ये सीबीआयला दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारे तपास करत सीबीआयने दोन जणांना अटक केली आहे. उत्तरप्रदेशमधील अतूलकुमार आणि जगमोहन सिंह या दोघांनी ही वेबसाईट सुरु केली होती. कॉम्प्यूटरविषयक विविध अभ्यासक्रम सुरु केल्याचा या दोघांचा दावा होता. प्रवेशाच्या नावाखाली आणि संस्थेची शाखा दुस-या शहरांमध्ये सुरु करण्यासाठी या दोघांनी काही लोकांकडून पैसे घेतल्याचा संशय आहे. पंतप्रधानांच्या नावाचा गैरवापर, गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, फसवणूक आणि ऑनलाईन फसवणूक या कलमांखाली या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सीबीआयने अटकही केली आहे.

सीबीआयच्या तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार हे दोघेही संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव असल्याचा दावा करायचे. वेबसाईटचे मुख्य कार्यालय दिल्लीत असून पुणे, अलीगढ, दिल्ली या भागांमध्ये आमची सुरु शाखा सुरु असल्याची बतावणी ते करत होते. सध्या या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु असून या प्रकरणात किती लोकांची फसवणूक झाली याचा तपास सुरु आहे. वेबसाईट खरी वाटावी यासाठी संस्थेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. याशिवाय संस्थेची नोंदणी करण्यात आल्याचा उल्लेखही वेबसाईटवर दिसून येतो. ग्रामीण भागात डिजिटल शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम सुरु केल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *